सोनपेठ (परभणी) : महातपुरी-सोनपेठ रस्त्यावर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास दोन दुचाकीं समोरासमोर धडकल्या. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शेख अमीन शेख तय्यब असे मृताचे नाव आहे.
गंगाखेड तालुक्यातील महातपुरी गावापासून जवळच सोनपेठ रस्त्यावर ३३ के.व्ही. केंद्रासमोर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास सोनपेठ रस्त्याने येणाऱ्या एका दुचाकीची ( एम एच १३ बी.जे. २९९९ ) महातपुरी येथून आनंदवाडीकडे जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीसोबत ( एम एच ३८ एन ०७७१ ) समोरासमोर धडक झाली. शेख अमीन शेख तय्यब ( ३५, रा. महातपुरी ) आणि बळीराम राघोजी दनदणे ( ६० ) हे गंभीर जखमी झाले.
अपघातातील दोन्ही जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून शेख अमीन यास मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देशमुख, परिचारिका माला घोबाळे, आशा डुकरे, लाटे यांनी जखमी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले.
माहिती मिळताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार प्रभाकर बाजगिरे. महातपुरी येथील पोलीस पाटील चाफळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.