परभणी : दैठणा पोलीसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे तालुक्यातील मौजे पोरवड येथे दोन बालविवाह टळले. पोलिसांनी महसूलच्या पथकाच्या मदतीने ही कारवाई केली.
तालुक्यातील दैठणा येथुन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे पोरवड येथे दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह होत असल्याची दैठणा पोलिसांना रविवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास मिळाली. यावर सपोनि अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार विश्वनाथ हंडे यांनी रात्रीच पोरवड गांव गाठून तिथे होत असलेल्या विवाह सोहळ्याची माहिती घेतली. यातून आज गावात तीन विवाह सोहळे होत असल्याची माहिती समोर आली.
यावरून आज सपोनि अमोल पवार, बिट जमादार विश्वनाथ हंडे, पो.ना. लक्ष्मण कांबळे, नारायणराव लटपटे, लक्ष्मणराव कातकडे, मपोशी सुप्रिया पवार, महसुल विभागाचे मंडळ अधिकारी कच्छवे, तलाठी फुटाणे यांच्या पथकाने दुपारपासूनच गावात ठाण मांडले. पथकाने तिन्ही विवाह सोहळ्यातील वधुच्या वयाची संपुर्ण माहिती घेतली असता दोन वधु अल्पवयीन असल्याच्या त्यांच्या लक्षात आले. त्यांनतर हे बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी थेट मंडप गाठले. यावेळी दोन्ही मुलींचे वय लग्नासाठी कमी असल्याची कल्पना त्यांच्या नातेवाईकाना दिली. तसेच बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे याची माहिती देत दोन्ही विवाह त्यांनी यशस्वीरित्या रोखले.
नियोजित 'वर' आलेच नाहीत पोलीस व महसुलचे पथक गावात आल्याची माहिती झाल्याने या दोन्ही लग्नांची नियोजित 'वर' गावात फिरकलेच नाही.