परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून पळ काढलेल्या तीन कोरोनाबाधित कैद्यांपैकी दोघांना पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे.
येथील जिल्हा कारागृहातील ८४ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने या कैद्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षातील एका हॉलमध्ये १६ कैद्यांवर उपचार सुरू होते. या हॉलमधील तीन कैद्यांनी स्वच्छतागृहाचे ग्रील तोडून पळ काढल्याची घटना १ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती.
या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली. कैद्यांना पकडण्यासाठी नानलपेठ पोलिस ठाण्याचे तीन आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे दोन पथक वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आले. २ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे एकास आणि हिंगोली येथून एका कैद्यास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नानलपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली.
पकडलेला एक कैदी खून प्रकरणातील तर दुसरा गांजाच्या तस्करी प्रकरणातील आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर.रागसुधा, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जमदाडे, पुयड, नाईक यांच्या पथकाने ही कामगिरी केली. दरम्यान पळून गेलेल्या आणखी एका कैद्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या भागात पथके रवाना केले असून, लवकरच या कैद्यासही जेरबंद केले जाईल, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.