परभणी : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीपैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असून, आता दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ९० कोटी रुपयांच्या रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान केले. खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बाधित पिकांचा पंचनामा केला. जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार ९७० शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली. प्रशासनाच्या अहवालाप्रमाणे राज्य शासनाने मागील महिन्यात जिल्हा प्रशासनाला ९० कोटी २० लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. दोन टप्प्यांत मदत अनुदान वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पावणेदोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे. आणखी ९० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यासाठी मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाला असून, त्यातून शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचे अनुदान वितरित केले जाणार आहे. त्यामुळे या निधीची जिल्ह्याला प्रतीक्षा लागली आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यातील एकाही तालुक्यात प्राप्त अनुदानाचे वाटप शिल्लक राहिलेले नाही. पुढील अनुदानाचा टप्पा प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार निधी वितरणाची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हेक्टरी १० हजार रुपयांची मदत
जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने पूर्वी जिरायती पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टर या शासनाच्या जुन्या नियमानुसार मागणी नोंदविण्यात आली होती. मात्र, राज्य शासनाने ९ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार बाधित पिकांसाठी ३ हजार २०० रुपये वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिरायती पिकांसाठी हेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे.
तालुकानिहाय वाटप झालेला पहिला टप्पा
परभणी : ५३१.२३
सेलू : १८७२.०६
जिंतूर : १६९८.९०
पाथरी : १४२६.१५
मानवत : १०८८.५९
सोनपेठ : ८५९.४२
गंगाखेड : ११.३९
पालम : ३४४.४६
पूर्णा : ११८८.६८