परभणी: कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील नागरी भागात शनिवार व रविवार अशी दोन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून १५ मार्चच्या सकाळी ६ वाजेपर्यंत परभणी महानगरपालिका क्षेत्र व ५ किमी. चा परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगर पंचायती आणि परिसरातील ३ किमी. चा परिसर या भागात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी व त्यांची वाहने, शासकीय, खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, लसीकरण केंद्र तपासणी केंद्र, वैद्यकीय आपत्कालीन व त्यासंबंधी सेवा, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेले व्यक्ती व वाहने, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व वितरक, पेट्रोल पंप व गॅस वितरक कर्मचारी व त्यांची वाहने, गल्ली, कॉलनी व सोसायटी आदी भागांमध्ये दूध विक्री करणारे विक्रेते, कोरोना लसीकरण केलेल्या व्यक्ती व लसीकरणासाठी जात असलेल्या व्यक्ती, परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी, परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या बसेस यांना या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.
संचार बंदीचे उल्लंघन करून कोणतीही व्यक्ती किंवा वाहने बाजारांमध्ये गल्लीमध्ये, घराबाहेर, फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६०चे कलम १८८ नुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत आढळलेले कोरोनाबाधित
दिनांक: बाधित: मृत्यू८ मार्च: २० : ००९ मार्च : १९: ०३१० मार्च: ५९ :०३११ मार्च: ७९: ०२१२ मार्च : ८२ : ०१