परभणी : उन्हाळ्याच्या दिवसातही कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सध्या कोणता ऋतू सुरू आहे, हे कळेनासे झाले आहे. तर दुसरीकडे ६ एप्रिल रोजी जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाटात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्रातून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील २४ तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर पुढील ४ दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ४ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. ६ एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तर ७ एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० किमी) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास कामाजी डाखोरे यांनी वर्तविला आहे.
असे करा फळबागेचे व्यवस्थापन
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी व आंबा फळ झाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे, पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. नवीन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी, जेणेकरून लहान रोपांचे प्रखर उन्हापासून संरक्षण होईल. आंबा बागेत फळगळ दिसून येत असल्यास १३ :००:४५ एनएए १५ पीपीएमची फवारणी करावी. तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी.
टरबूज, खरबूजची करा काढणी
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा (तुषार किंवा ठिबक) वापर करावा.