परभणी : जिंतूर शहरातील बसस्थानक परिसरात एका दुकानामध्ये झालेल्या चोरीच्या घटनेतील दोन आरोपींना परभणीपोलिसांच्या पथकाने जिंतूर येथून नुकतेच ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जिंतूर शहरातील बसस्थानक समोरील संस्कृती झेरॉक्स सेंटर येथून एक इन्व्हर्टर, दोन बॅटरी, लॅमिनेशन मशीन असा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणी जिंतूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासात आरोपीचा शोध घेतला असता गोपनीय माहिती मिळाली. ज्यात हा गुन्हा तीन आरोपींनी मिळून केल्याचे समजले. त्यापैकी दोन आरोपी शेख सोहेल शेख रसूल (रा. चपराशी कॉलनी, जिंतूर), शिवाजी शामराव सोळंके (रा. बंजारा कॉलनी) यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली. तिसरा आरोपी सय्यद माबूद सय्यद मन्सूर (रा. गुलशन कॉलनी, जिंतूर) यास मंगळवारी अटक करण्यात आली. या आरोपीस दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी शेख सोहेल याच्याकडून १९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला तर एकूण ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक रागसुधा आर., पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफणे, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मुख्तार सय्यद, खोले, पोलिस कर्मचारी दीपक वाटोडे, संदीप पांचाळ यांनी केली.