पाथरी: एकाच दिवशी काही वेळाच्या अंतराने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची हृहयद्रावक घटना पाथरी शहरातील शिक्षक कॉलनीत मंगळवारी घडली आहे.या घटनेने शहरवासीयांनी हळहळ व्यक्त केली.
पाथरी शहरातील शिक्षक कॉलनीत गोविंदराव उपाध्ये यांचे कूटुंब वास्तव्यास आहे. गोविंदराव उपाध्ये यांच्या पत्नी जेष्ठ नागरिक सुमनबाई गोविंदराव उपाध्ये (७५) यांचे आज सकाळी ११ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांचा मुलगा उपेश (४८ ) हा त्यावेळी घरातील खोलीत झोपलेला होता.आईचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या पत्नी सांगण्यासाठी गेल्या असता उपेश जागे झाले नाहीत.यामुळे उपाध्ये कुटूंबाने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासून उपेश यांचा काही वेळापूर्वी मृत्यू झाल्याचे निदान केले.
एका धक्क्यातून सावरत नाहीत तोच हा दूसरा धक्का उपाध्ये कुटूंबास बसला.एकाच दिवशी आई व मुलाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.जुन्या पिढीतील शिक्षक म्हणून गोविंदराव उपाध्ये यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी सुमनबाई या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या शांत, संयमी व मनमिळाऊ म्हणून परिचित होत्या.दुपारी दोन वाजता रामपूरी येथील गोदाकाठी सुमनबाई व मुलगा उपेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती गोविंदराव उपाध्ये, दमरे विभागाचे रेल्वे कर्मचारी भालचंद्र,दोन मुली,जावई,सुना,नातवंडे असा परिवार आहे.