पूर्णा (परभणी ) : कान्हेगाव येथे नियम डावलून वाळू उपसा केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी धडक कारवाई केली. यात दोन जेसीबी मशीन जप्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर १५ लाखाचा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.
कान्हेगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रातून वाळूचा नियमबाह्य उपसा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांना मिळाली. यावरून त्यांनी बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास येथील वाळू धक्क्यावर भेट दिली. यावेळी येथे दोन जेसीबी अवैधरीत्या वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी यांनी स्थानिक पोलिस अधिकारी व नायब तहसीलदार यांना याबाबत सूचना दिल्या. यावरून या मशीन्स जप्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर १५ लाखाचा दंड लावण्यात आला असल्याची माहिती नायब तहसीलदार वंदना मस्के यांनी दिली