परभणी- शहरातील बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन आरोपींकडून एक गावठी पिस्तुल, दोन जीवंत काडतुस आणि एक खंजर असे शस्त्र जप्त केले आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी परजिल्ह्यातील आहेत.
परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने पोलीस पथक रात्रीची गस्त घालत आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक गस्त घालत असताना उड्डाणपुलाखाली अण्णाभाऊ साठेनगर भागात युनिकॉर्न गाडीवर बसून दोघे संशयितरित्या जात असताना दिसून आले. पोलिसांनी पाठलाग करुन दोघांनाही ताब्यात घेतले. कतारसिंग हत्यारसिग टाक (१९, रा.इंद्रनगर कळमनुरी) आणि कुलदीपसिंग चतुरसिंग टाक (२०, रा.नारायणनगर कळमनुरी ह.मु.सरगमनगर सोलापूर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींची झडती घेतली असता एक गावठी पिस्तुल, दोन जीवंत काडतुस, एक खंजर, दोन मोबाईल आणि विना नंबरची दुचाकी असा ७३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, संजय शेळके, किशोर चव्हाण, सय्यद मोबीन, सय्यद मोईन, दिलावर खान, जमिरोद्दीन फारोखी, अरुण कांबळे, शंकर गायकवाड, परमेश्वर शिंदे यांनी केली.