पाथरी (परभणी ) : विजेच्या कडकडाटासह वादळीवारे आणि पावसात सोमवारी (दि. १५ ) सायंकाळी पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथे वीज कोसळून दोन मेंढपाळाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला. तसेच ३९ शेळ्या यात मृत्युमुखी पडल्या. जखमीला अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
पाथरी परिसरात सोमवारी (दि.15) विजेच्या कडकडाटासह सायंकाळी 7 .30 च्या सुमारास पाऊस पडला. अंधापुरी येथील चंद्रकांत मोरे यांच्या शेतात बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सुरणवाडी येथील मेंढपाळ वास्तवास होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात आडोशासाठी झाडाखाली बसलेल्या तीन मेंढपाळासह शेळ्यावर वीज कोसळली. यात लिंबाजी सीताराम काळे ( 35) आणि कृष्णा रामभाऊ शिंदे (17) या दोन मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला तर रामभाऊ सादु शिंदे हा जखमी झाला. जखमी मेंढपाळास उपचारासाठी अंबेजोगाई येथे हलविण्यात आले आहे. याच घटनेत 39 शेळ्या ही मृत्यमुखी पडल्या आहेत. आज सकाळी मंडळ अधिकारी गोवंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.दरम्यान, मृत्यू पावलेल्या दोघांवर मंगळवारी (दि.16) सकाळी पाथरी ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले.