परभणी : येथील नानलपेठ पोलीस ठाण्यातील बडतर्फ कर्मचाऱ्याने विमा पॉलिसीचे पैसे अवैध मार्गाने कमावण्यासाठी कट रचून दोन खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली असून, खुनाच्या एका प्रकरणात पोलिसांनी अन्य तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
परभणी-मानवत रस्त्यावर शहरापासून १५ कि.मी. अंतरावर प्रकाश गायकवाड (रा. संबर) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना मयत व्यक्तीच्या नावावर ॲक्सिस बँकेत विमा असल्याची कागदपत्रे विमा कंपनीकडून तपासात हस्तगत करण्यात आली. यात नानलपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी संतोष अंजीराम जाधव वारसदार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात संतोष जाधव याचा सहभाग असल्याने या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी कलम ३०२, ३४ भा.दं.वि. हे दोन कलम वाढवून तपास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काकडे यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला असता, मयत व्यक्तीचा विम्याचा लाभ मिळविण्यासाठी संतोष जाधव याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सेलू येथे प्रकाश गायकवाड याचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपघाताचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हा पोलिसांची वारंवार दिशाभूल करीत होता. कसून तपास केला असता आरोपी सेलू येथीलच असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आरोपी रहिमोद्दीन (बुंबा), मोईनोद्दीन शेख (रा.विद्यानगर, सेलू), अभय अशोक महाजन (रा.विद्यानगर, सेलू), उमेश अर्जुन तोडे (रा.अर्जुननगर, सेलू) यांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी रहिमोद्दीन व अभय महाजन हे सराईत गुन्हेगार आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे. पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, गणेश राहिरे, सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, रामोड, पुयड, कर्मचारी जक्केवाड, चट्टे, तुपसुंदरे, चव्हाण, अझहर, खुपसे, मोबीन, संतोष सानप, निळे, घुगे, सोनवणे, सायबर शाखेतील पुरणवाड, बासलवार, बारहाते, बालाजी रेड्डी यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
महिलेच्या खुनातही सहभाग
यापूर्वी एका महिलेचा खून झाला होता. त्यातही पोलीस कर्मचारी संतोष जाधव याचा सहभाग होता. या प्रकरणात त्याला बडतर्फ करण्यात आले होते. संतोष जाधव हा सरकारी दवाखाना चौकी येथे कर्तव्यावर होता. विमा पॉलिसीचे पैसे अवैध मार्गाने कमावण्यासाठी कट रचून त्याने दोन खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले.