परभणी : अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या युवकास संपविण्याच्या घटनेबरोबरच अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्याच्या घटनेने जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. खून, मारहाण, जबरी चोरी यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा आणि दुधना या नद्यांचे विस्तीर्ण पात्र असल्याने वाळूचा गोरखधंदा येथे मोठ्या प्रमाणात चालतो. अवैध वाळू उपशाला विरोध केल्याने पालम तालुक्यातील रावराजूर येथे वाळूमाफियांनी गावातीलच माधव शिंदे याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना २५ मार्च रोजी घडली. या प्रकरणात अजूनही पाच आरोपी फरार आहेत.
पोलिसांवरच दगडफेकऊसतोड कामगाराचा खून करून त्याला पालम तालुक्यातील फळा येथे आणून टाकल्याची घटना २७ मार्च रोजी घडली. या प्रकरणातही एक आरोपी फरार आहे, तर सेलू तालुक्यातील लाडनांदरा येथे अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस निरीक्षकासह अन्य चार कर्मचारी जखमी झाले होते. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत वाद घातल्याचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहेत. यशिवाय अवैध दारूविक्री, जुगार, घरफोड्यांच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. अवैध धंद्यांना विरोध करणाऱ्या युवकाचा खून आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक केल्याच्या या घटनांनी जिल्ह्यात गुन्हेगारांचे धारिष्ट वाढले काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांवरच जर हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय? अशी भावना नागरिकांत निर्माण झाली असून, असुरक्षितता वाढत आहे. या सर्व घटनांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.