पाथरी (जि.परभणी) : मित्रांसोबत नववर्ष साजरे करून दुचाकीने सेलूकडे जाणाऱ्या दोघांचा आयशर-दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पाथरी-सेलू रस्त्यावर बोरगव्हाण पाटीजवळ घडली.
पाथरी येथील आकाश श्रीरंग चव्हाण (रा. इंदिरा नगर) याच्याकडे सेलू येथील शेख आदनन शेख शफी आणि शाहेद फरद मिर्ज बेग हे दोन मित्र सेलू येथून पाथरी येथे ३१ डिसेंबरला रात्री नववर्ष साजरे करण्यासाठी आले होते. जेवण केल्यानंतर हे तिघेही मित्र पाथरी येथून सेलूकडे जाण्यासाठी रात्री १२ वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन (क्रमांक एमएच २२, बी.ए. ९८६३) निघाले होते. पाथरी-सेलू रस्त्यावर बोरगव्हाण शिवारामध्ये येताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरला (क्रमांक एम. एच. २० जीसी०६३४) दुचाकीची जोरदार धडक झाली. यात अपघातामध्ये दुचाकी आयशरमध्ये अडकून अक्षरशा तिचा चेंदामेंदा झाला. अपघातामध्ये जखमी आकाश श्रीरंग चव्हाण, शेख आदनन शेख शफी, शहेद बेग यांना तातडीने पाथरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र अपघातातील गंभीर जखमी शेख आदनन आणि आणि आकाश चव्हाण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत आकाश चव्हाण यांचा भाऊ राजू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयशर टेम्पोमध्ये पाय डोके बांधलेले १६ बैलसेलू येथून पाथरीकडे येणाऱ्या आयशरमध्ये १६ बैल कत्तलीसाठी आणले जात होते. बैलाची निर्दयी व क्रूरपणे पाय, डोके बांधून कोंबण्यात आले होते. त्यामुळेच आयशर टेम्पो भरधाव वेगाने चालवण्यात येत होता. तसेच वळणावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवले, अशी फिर्याद देण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.