- अनिल शेटेगंगाखेड(परभणी): शहरातील डाॅक्टर लाईन भागातील फर्निचर व ड्रायक्लिनर्स ही लगत असलेली दोन दुकाने शार्टसर्कीटने लागलेल्या आगीत जळून खाक झाली. या दोन्ही दुकानाचे मिळून अंदाजे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज पहाटे ४ वाजता घडली. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दोन्ही दुकाने खाक झाली.
अरविंद साळवे यांचे बालाजी फर्निचर आणि बंडू वाघमारे यांचे मयूर ड्रायक्लिनर्स ही दोन दुकाने डाॅक्टरलाईन भागात शेजारी आहेत. आज पहाटे अचानक शाॅर्टसर्कीट झाल्याने दोन्ही दुकानात आग लागली. काही वेळातच दोन्ही दुकाने आगीने वेढली. काही नागरिकांनी आगीची माहिती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागास दिली. अग्निशमन दलातील राम खंडेलवार, शाम जगतकर, श्रीकांत साळवे, अभिजित साळवे,सुरज खंडेलवार यांच्या पथकाने काही वेळात आग आटोक्यात आली. मात्र, आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत दोन्ही दुकाने जळून खाक झाली होती.
आगीत अरविंद साळवे यांच्या दुकानातील तयार फर्निचर, मशीन्स आदी माल जळून अंदाजे ५ लाख रूपयांहून अधिकचे नुकसान झाले. तर बंडू वाघमारे यांच्या दुकानातील ड्रायक्लिन आणि लाँड्रीसाठी आलेले महागडे कपडे, मशीन्स आदी जळून अंदाजे १० लाखाचे नुकसान झाले.