आखाडा बाळापूर ( हिंगोली) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आखाडा बाळापूर शाखेतील शाखाधिकारी व रोखपालास निलंबित केले आहे, तर एका कर्मचाऱ्याची बदली केली आहे. या शाखेत ५0 लाखांच्या घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची चर्चा दिवसभर होती. मात्र, बँकेचे परभणी येथील प्रशासन यावर काहीच बोलायला तयार नव्हते.
आखाडा बाळापूर येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तिमाही आॅडिटची प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यात काही खातेदारांच्या खात्यावरून रक्कमा गायब असल्याचा प्रकार समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळे बरीच धापवळही झाली. तर अंतर्गत तपासणी अधिकाऱ्याने बाळापूर शाखेत तपासणी केली असता रोकड कमी असल्याचे निष्पन्न झाल्याचेही सांगितले जाते. त्यानंतर रोखपाल एस. एम. धांडे यांना ४ फेब्रुवारी रोजी निलंबित केल्याची माहिती बँकेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. तर चार दिवसांच्या फरकाने शाखाअधिकारी आर. एस. जाधव यांनाही निलंबित केले. तर एका कर्मचाऱ्याची बदली केली आहे. एकाच वेळी बँकेतील दोघांना निलंबित व एकास बदलीवर पाठविल्याने बाळापूर परिसरामध्ये हा विषय चर्चेचा बनला आहे. अनेकजन बँकेकडे विचारणा करीत आहेत, मात्र, बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे.
शाखाधिकारी रुजू बँकेत तातडीने शाखाधिकारी म्हणून साठे रुजू झाले आहेत. त्यांना याबाबत विचारणा केली असता मी आजच रुजू झालोय. याबाबत मला फारशी माहिती नाही, असे उत्तर देत त्यांनी हात वर केले. परभणी येथील मुख्य शाखेतील मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांना या संबंधी माहिती विचारण्यासाठी अनेक वेळा फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. बँकेने या घटनेवर कितीही पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला तरीही परिसरात मात्र बँकेत घोटाळा झाल्याची चर्चा सुरू आहे.