शहरातील पंचायत समिती परिसरात संत गाडगेबाबा व्यापारी संकुलात असलेल्या किराणा दुकानासह बियर शॉपी व अन्य एक दुकान अशी तीन दुकाने २३ डिसेंबर रोजी फोडत चोरट्यांनी प्रमोद चिंतामण कवठेकर यांच्या किराणा दुकानातील बदाम, खारीक आदी सुखा मेवा रोख स्वरूपात चिल्लर रकम असा पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. एकाच रात्रीत तीन दुकाने फोडल्याची घटना घडल्याने याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरी सुदर्शन तुळशीराम जाधव (वय ३०, रा. तुळजाभवानी नगर, गंगाखेड), विनोद बाबूराव लोखंडे (वय २५, रा. इंदिरानगर परळी), सुरज नितीन जाधव, सुखदेव मारोती पवार (रा. वसमत) व सुखदेव पवार याचा जावई लिंग्या यांनी केल्याची तसेच या गुन्ह्यातील सुदर्शन जाधव व विनोद लोखंडे हे दोघे गंगाखेड शहरातील तुळजाभवानी नगरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मिना यांच्या पथकातील पोउपनि विश्वास खोले, जमादार सुग्रीव केंद्रे, पो. ना. चिंचाणे, फारुखी, विष्णू भिसे यांनी सापळा रचून सुदर्शन तुळशीराम जाधव व विनोद बाबूराव लोखंडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सुदर्शन जाधव यांच्या घरातून चोरीच्या गुन्ह्यातील एक किलो बदाम आणि सहा किलो खारीक जप्त करून दोघांनाही गंगाखेड पोलीसांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्यातील अन्य तीन चोरटे मात्र अद्यापही फरारच असल्याने त्या तिघांचा शोध घेणे सुरू आहे.
दुकान फोडीतील दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:18 AM