पूर्णा (जि.परभणी) : गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाईस सुरुवात केली आहे. शनिवारी सातेगाव- कंठेश्वर पूर्णा नदीपात्रात कारवाई करून दोन हायवा, एक जेसीबी जप्त केली. तसेच तराफेही नष्ट केले. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पूर्णा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात आहे. रात्रंदिवस नदीपात्रातून तराफ्याच्या मदतीने वाळू नदी काठावर आणून जेसीबीच्या मदतीने हायवा वाहनातून विक्री केली जात आहे. याविरोधात कारवाई होत नसल्याने गौण खनिज माफियांचे मनोबल वाढले. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना लागत होता. दरम्यान, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर पदभार स्विकारातच कारवाईला सुरुवात केली.
शनिवारी सकाळी जीवराज डापकर यांनी तहसीलदार माधवराव बोथीकर, मंडळ अधिकारी के.व्ही. शिंदे, तलाठी तूपसमिंद्रे, पोलिस पाटील वारकड यांना सोबत घेऊन सातेगाव येथील नदीपात्रात धाड टाकली. त्या ठिकाणी तराफे, दोन हायवा, एक जेसीबी आढळून आला. हे सर्व जप्त करून वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे इतर पंप, पाइप, तराफे जाळून नष्ट करण्यात आले आहेत. जप्त केलेले हायवा, जेसीबी मशीन चुडावा पोलिस स्टेशन येथे ठेवण्यात आली आहे. वाहनावर पूर्णा तहसील कार्यालयामार्फत कारवाई दंडात्मक करण्यात येणार असून या धाडीमुळे अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.