येथील संदीप मुंजाजी गिते हे अन्य एका व्यक्तीसोबत २० जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जीपमधून (एम.एच.३०/बी७२०६) जात होते. त्यांना गंगाखेड नाका येथील रेल्वे फाटकातून पुढे जायचे असल्याने उड्डाणपुलाखालून त्यांनी जीप त्या दिशेने नेली. मात्र उड्डाणपुलाखालीच त्यांची जीप अडवून तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे गिते व त्यांचे सहकारी घाबरुन गेले. आरोपींनी त्यांच्या खिशातील साडेतीन हजार रुपये व मोबाईल काढून घेतला. लाल रंगाच्या मोटारसायकलवर बसून ते पसार झाल्याची माहिती गिते यांनी पोलिसांना दिली.
ही माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटीेल, व्ही.एस. आरसेवार हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी संदीप गिते यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल बाहत्तरे तपास करीत आहेत.
येथील वसमत रस्त्यावर एका विद्यार्थ्यास लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली होती. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. याच दिवशी रात्री १०.३० च्या सुमारास उड्डाणपुलाखाली लुटण्याची घटना घडली. त्यामुळे शहरवासियांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.