परभणी : शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने राज्यभरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बीड जिल्ह्यातील परळी येथून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून वीस दुचाकी हस्तगत केल्या. यामध्ये राज्यातील विविध ठिकाणचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी परभणी शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हे उघडकीस आणणे आणि आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी शहरात चोरीला गेलेल्या दुचाकी चोरीचा तपास सुरू केला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, पोलीस कर्मचारी बालासाहेब तूपसमुद्रे, रवी जाधव, रफीयोद्दिन शेख, निलेश परसोडे, हुसेन पठाण, गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, गौस पठाण यांनी माहितीच्या आधारावरून तांत्रिक विश्लेषण करून दुचाकी चोरीचे बरेच गुन्हे केलेला अखिल महबूब शेख (रा.मंगळवार पेठ, अंबाजोगाई) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करून सापळा रचून त्यास परळीतून ताब्यात घेतले. त्याने परभणीसह इतर जिल्ह्यातील गुन्हे करून अनेक दुचाकी चोरल्याची माहिती दिली. कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सपोनि. पांडुरंग भारती, राजू मुत्येपोड, उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार यांच्यासह पथकाने केली.
चार पथके विविध जिल्ह्यात तपासासाठीयात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, राजू मृत्येपोड, पोउपनि. गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार यांच्या अधिपत्याखाली चार पथके तयार केली. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे बीड, परळी, लातूर, मरुड, बार्शी, सोलापूर अशा विविध ठिकाणाहून वीस दुचाकी हस्तगत केल्या. त्याने चोरलेल्या दुचाकीची विल्हेवाट लावणारा त्याचा आणखी एक साथीदार असून त्याच्याकडे काही दुचाकी असल्याची माहिती आरोपीने दिली. त्याचाही शोध स्थागुशा पथकाकडून सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास गुरुवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.
परभणी, सोलापूर, लातूरचे गुन्हे उघडकीससदर आरोपीकडून आतापर्यंत २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यातून परभणी जिल्ह्यातील सहा, सोलापूर दोन, लातूर दोन असे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. इतर मिळून आलेल्या दुचाकीच्या संबंधाने दाखल गुन्ह्यांच्या तपास सुरू आहे.