परभणी : पेट्रोल पंपावरील दिवसभराची रक्कम घेऊन घराकडे निघालेल्या एका कर्मचाऱ्याची दीड लाख रुपयांची बॅग मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी पळविल्याची घटना २१ जून रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
येथील शनिवार बाजार परिसरातील भिकुलाल पेट्रोल पंपावर अब्दुल सत्तार शेख नबी हे कर्मचारी आहेत. सोमवारी पेट्रोल पंपावर जमा झालेली दिवसभरातील रक्कम घेऊन अब्दुल सत्तार हे रात्रीच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. त्याच वेळी मोटरसायकलवर दोन चोरटे पेट्रोल पंपाच्या जवळ आले. या दोघांनी हिसका देऊन ही बॅग पळविली. त्यात दीड लाख रुपये असल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. दरम्यान याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. शहरातील मध्यवस्तीत रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैद पेट्रोल पंपावर दीड लाख रुपयांची रक्कम पळवून नेल्याच्या प्रकरणातील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी दोन पथक नियुक्त केले आहेत. चोरट्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली.