लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : तालुक्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी तालुका प्रशासनाने शहरातील संत जनाबाई् कनिष्ठ महाविद्यालयाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अघोषित सुटी देण्यात आली आहे. यामुुळे महाविद्यालयातील नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे.
गंगाखेड तालुक्यात ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या संदर्भातील कामकाज तहसील कार्यालयातून होणे अपेक्षित असताना या कार्यालयाने शहरातील संत जनाबाई कनिष्ठ महाविद्यालयातील ७ कक्ष व एका सांस्कृतिक सभागृहाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे येथील अकरावी व बारावीचे कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांचे वर्ग दिनांक २३ डिसेंबरपासून बंद करण्यात आले आहेत. हे वर्ग कधी सुरु होतील, हे निश्चित नाही. त्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिने उशिराने शैक्षणिक वर्ष सुरु झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. हे नुकसान भरुन काढण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात शासनाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षणासाठी येत होते; परंतु, आता निवडणूक विभागानेच या महाविद्यालयातील प्रमुख कक्षांचा ताबा घेतल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नाईलाजाने घरी बसावे लागत आहे. जवळपास २८ दिवस ही निवडणूक प्रक्रिया चालणार आहे.
त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्ग सुरु होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तहसील प्रशासनाने यासाठी एखादे मंगल कार्यालय घेतले असते तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला नसता. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या संदर्भात प्राचार्य एम. बी. धूत म्हणाले की, तहसीलदारांनी उपयुक्त कामांसाठी सभागृह व कक्षाची मागणी केल्यास सदरील कक्ष व सभागृह देणे क्रमप्राप्त ठरते.
तालुक्यातील रुमणा व ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने ऑनलाईन शिक्षणात अडथळा येत आहे. शिवाय आपल्याकडे स्मार्टफोन नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत नाही. नियमित वर्ग झाले असते तर शैक्षणिक नुकसान टळले असते. तहसीलदारांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाकडे दुर्लक्ष केले आहे. - आकांक्षा कांबळे, विद्यार्थिनी