मानवत : पाथरी ते परभणी राष्ट्रीय महामार्गावर कोल्हा परिसरात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर टायर फुटल्याने अनियंत्रित झालेल्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देत फरफटत नेले. यात एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर परभणी येथे उपचार सुरु आहेत. ही घटना ६ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
कैलास कच्छवे हे शहरातील आठवडे बाजार परिसरातील एसबीआय शाखेत हंगामी कर्मचारी आहेत. दुपारी १ वाजेच्या सुमारास ते किरण गवळी व गोविंद नाईक ( रा शिवाजीनगर, मानवत ) यांच्या सोबत दुचाकीवर ( क्रमांक एम एच २२- ए एफ ९०७८) मानवतकडून परभणीकडे जात होते. दुचाकी रेल्वे उड्डाणपुलावर आली असता परभणीकडून मानवतकडे येणाऱ्या कारचे ( क्रमांक एम एच २२ - ७५१) अचानक टायर फुटले. यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला. कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक देत तिघा मित्रांना पन्नास फुटापर्यंत फरफटत नेले.
या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही १०८ रुग्णवाहिकेतून परभणीतील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून किरण गवळी (२०) यास मृत घोषित केले. यानंतर कैलास कच्छवे आणि गोविंद नाईक यांच्यावर परभणी येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कारचा चालक अपघातानंतर फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.