- विठ्ठल भिसेपाथरी : लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर जातीचे ध्रुवीकरण झाले आहे. लोकसभेत जरांगे फॅक्टर यशस्वी झाला. त्याचे पडसाद आता विधानसभा निवडणुकीत हळूहळू दिसू लागले आहेत. या निवडणुकीत विकासाचे मुद्दे आणि प्रश्न बाजूला राहिले असून, जातीपातीच्या राजकारणाचा कहर आला आहे. त्यासाठी जातीचे समीकरण सर्वच उमेदवारांकडून जुळविले जात आहे. या समीकरणावरच निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.
पाथरी विधानसभा निवडणुकीसाठी बहुरंगी लढत अपेक्षित दिसत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसचे सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी मिळाल्याने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची बंडखोरी झाली. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळाल्याने येथे सईद खान यांनी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये कोणाचा कोणाला फटका बसणार आणि कोणाचा कोणाला फायदा होणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. उमेदवारी दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांनी गावोगावी बैठका प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे.
निवडणूक प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे गायब झाले आहेत. यावेळीची निवडणूक जातिपातीवर येऊन ठेपली आहे. मागील वर्षभरापासून मनोज जरांगे फॅक्टर चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणामही दिसून आले. यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद दिसून येऊ लागल्या आहेत. मनोज जरांगे यांनी अद्याप पाडायचे की लढायचे ? याबाबत निर्णय घोषित केला नाही. या निर्णयाकडेही लक्ष लागले आहे. मराठा मतासोबतच ओबीसी मुस्लिम आणि मागासवर्गीय मताच्या गणिताकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. गावातील मतांची गोळाबेरीज जातीच्या समीकरणावर केली जाऊ लागली आहे.