मानवत: तालुक्यातील नागरजवळा येथे पाऊस सुरु असताना शेतात काम करत असलेल्या 17 वर्षीय मुलाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी ( दि. 12 ) दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील नागरजवळा येथील अल्पभूधारक बालाजी रासवे हे यांची गावच्या शिवारात शेती आहे. यंदा कापसाचे पीक घेतले असून 12 ऑक्टोबर रोजी फुटलेल्या कापसाची काढणी सुरू होती. यावेळी बालाजी रासवे यांचा मुलगा गोरक्ष बालाजी रासवे हा शेतात वेचणीसाठी आलेल्या महिलांकडून काम करून घेत होता. दुपारी 3 वाजेच्या सुमारास आभाळ दाटून आल्यानंतर विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.पाऊस सुरु असताना जोरदार वीज कडाडून गोरक्ष यांच्या अंगावर पडली या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
गोरख रासवे या वर्षी दहावी उत्तीर्ण झाला होता.त्याने आकारावीला प्रवेशही घेतला होता. मात्र सद्यस्थितीत शाळा-महाविद्यालय सुरु नसल्याने वडिलांना शेतातल्या कामात मदत करू लागला. शेतात काम करत असतानाच वीज अंगावर पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.