लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड: आठ दिवसांपासून बंद झालेली बस पूर्ववत सुरु करावी, या मागणीसाठी तालुक्यातील मसला येथील विद्यार्थ्यांनी २८ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात शाळा भरवून आंदोलन केले. मग बस तिथे येऊन मुलांना घेऊन गेली.गंगाखेड तालुक्यातील झोला, पिंपरी, सावंगी भूजबळमार्गे मसला येथे जाणाºया रस्त्याचे काम सुरु असल्याने कंत्राटदाराने पर्यायी रस्ता काढून दिला आहे. मात्र या पर्यायी रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने आठ दिवसांपासून मसला गावाकडे जाणारी बस बंद करण्यात आली होती. बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. बस सुरु करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मसला, सावंगी भूजबळ, झोला, पिंपरी येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी २८ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढून तहसीलदार आसाराम छडीदार यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरविली. त्यानंतर छडीदार यांनी प्रल्हादराव मुरकुटे, भगवान शिंदे यांच्याशी चर्चा करुन कंत्राटदारास तातडीने काम पूर्ण करावे, पर्यायी रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवावा, अशा सूचना दिल्या. राज्य परिवहन महामंडळाचे आगारप्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे यांनाही बस सुरु करण्याचे सूचित केले.प्रल्हादराव मुरकुटे, भगवान शिंदे, छत्रपती शिंदे, नागेश शिंदे, राम शिंदे, गोविंद शिंदे, रमेश गहिरे, रामकिशन शिंदे, अप्पासाहेब कदम, बालासाहेब शिंदे, विनायक शिंदे, पांडुरंग शिंदे, प्रकाश शिंदे, गणपती शिंदे, नामदेव शिंदे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तहसीलदार आसाराम छडीदार, पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी मध्यस्थी केली....अन् हलली यंत्रणा !बसच्या मागणीसाठी विद्यार्थी व ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तातडीने हलली. मसला या गावासाठी जाणारी बस थेट तहसील कार्यालयातच बोलविण्यात आली आणि या ठिकणाहूनच विद्यार्थी, ग्रामस्थ बसमध्ये बसून मसला गावाकडे रवाना झाले.
परभणी जिल्ह्यात बससाठी अनोखे आंदोलन ; चक्क तहसीलमध्ये आली विद्यार्थ्यांसाठी बस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:01 AM