परभणी : माझ्या विरोधात तू बोलत आहेस, असे म्हणून दमदाटी करीत मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे ताडकळस येथील शहरप्रमुख बालाजी रुद्रवार यांच्या तक्रारीवरुन शिवसेनेचेच खा. बंडू जाधव यांच्याविरुद्ध परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील शिवसेनेचे शहरप्रमुख बालाजी चंद्रकांत रुद्रवार यांनी रविवार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची भेट घेऊन खा.बंडू जाधव यांच्याविषयी तक्रार दिली. त्यामध्ये खा. जाधव यांनी २३ सप्टेंबर रोजी मला घरी बोलावून घेतले. घरी आल्यानंतर तू माझ्या विरोधात का बोलतोस, असे म्हणून खा. जाधव व रामप्रसाद रणेर यांनी मला थापड-बुक्क्यांनी मारहाण केली, असे म्हटले आहे. या तक्रारीवरुन सोमवारी कलम ३२३, ५०६ भा.दं.वि.नुसार नानलपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार पिंपळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
या प्रकरणी प्रतिक्रियेसाठी खा.जाधव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, ते म्हणाले की, गेल्या चार-पाच महिन्यांपासून रुद्रवार हे माझ्या विरोधात चुकीचे वक्तव्य करीत आहेत़ याबाबत त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी त्यांना बोलावून घेतले होते़ यावेळी त्यांना त्यांचेच मोबाईलवरील रेकॉर्डिंग ऐकावित असताना ते आपल्याविषयी एकेरी भाषेचा वापर करीत होते़ यावेळी सोबतच्या कार्यकर्त्याचा राग अनावर झाल्याने ते त्यांच्या अंगावर धावून गेले़ मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे़ त्यामुळे रुद्रवार यांना कोणीही मारहाण केलेली नाही़ त्यांचा आरोप चुकीचा आहे, असे ते म्हणाले़
दरम्यान, रुद्रवार हे ताडकळसचे माजी सरपंच आहेत. त्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी ताडकळस येथील काही दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला होता.