परभणी: अडीच महिन्याच्या खंडानंतर १ जून रोजी नांदेड येथून निघालेल्या सचखंड एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी करुनच रेल्वे डब्यात प्रवाशांना प्रवेश देण्यात आला. अनेक दिवसानंतर प्रवासी रेल्वे रुळावरुन धावलेल्याने प्रवाशांचा आनंद दिसून येत होता.
लॉकडाऊनमुळे बंद असलेली रेल्वे १ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. प्रत्यक्षात राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरु झाली नसली तरी राज्याबाहेर जाण्यासाठी रेल्वेसेवा सोयीची ठरत असल्याने परभणी रेल्वेस्थानकावरुन राज्याबाहेर प्रवेश करणाऱ्या ६५ प्रवाशांनी तिकीट आरक्षण केले होते. नियोजित वेळेनुसार नांदेड येथून सुटलेली रेल्वे सोमवारी सकाळी २० मिनिट उशिराने परभणी रेल्वेस्थानकावर दाखल झाली. त्यापूर्वी रेल्वे स्थानकाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्व प्रवाशांना दीड तास आधीच स्थानकावर बोलावून घेतले होते. पूर्णा येथून डॉक्टरांचे पथक स्थानकावर दाखल झाल्यानंतर या डॉक्टरांनी प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी करुन प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला. त्यानंतर प्रत्येक प्रवासी आपापल्या कोचनुसार प्लॅटफॉर्मवर थांबले. १०.५५ वाजता रेल्वे स्थानकात दाखल झाली. त्यानंतर ११ वाजेच्य सुमारास ही रेल्वे पुढील प्रवासाला निघाली. परभणी रेल्वे स्थानकावरुन ६५ प्रवाशांनी आरक्षण केले असले तरी प्रत्यक्षात ६३ प्रवाशांनीच प्रवास केला.