सेनगाव तालुक्यातील कवठा येथील सेवा सहकारी सोसायटी गटातील राजेंद्र रंगनाथराव देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतर्गत सेनगाव गटातून माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर वेलतुरा येथील हिंमत खरबळ यांनी आक्षेप घेऊन देशमुख यांची संस्था थकीत असल्याने त्यांचे नाव मतदारयादीत नोंदवू नये, अशी मागणी विभागीय उपनिबंधकांकडे केली होती. त्यानंतर विभागीय उपनिबंधकांनी त्यांची मागणी मान्य करून देशमुख यांचे मतदारयादीतील नाव वगळण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयास देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांचा आदेश रद्द करून देशमुख यांचे नाव मतदारयादीत घेण्याचे २ फेब्रुवारी रोजी आदेशित केले होते. या निर्णयास हिंमत खरबळ यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी सुनावणी होवून सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा आदेश रद्दबातल ठरवून विभागीय सहनिबंधकांचा आदेश कायम ठेवला. यासंदर्भातील निकाल १५ मार्च रोजी देण्यात आला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बुधवारी राजेंद्र देशमुख यांचे मतदार यादीतील नाव वगळण्यात आले आहे. परिणामी त्यांची उमेदवारी आपोआप रद्द ठरली असून, साहेबराव पाटील गोरेगावकर हे बिनविरोध निवडले गेले आहेत. आ. सुरेश वरपूडकर यांच्या गटासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिलासा देणारा ठरला आहे.
सेनगावमधून साहेबराव पाटील यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:17 AM