बसपोर्टच्या उभारणीसाठी येथील बसस्थानकाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली असून, पत्र्याच्या शेडमध्ये स्थानकाचा कारभार चालविला जात आहे. चार ते पाच बस उभ्या राहू शकतील, एवढीच जागा स्थानकात आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या बसेस स्थानकात आणताना आणि बाहेर नेताना चालकांना कसरत करावी लागते. जागेअभावी मनाला वाटेल तेथे बस उभ्या केल्या जातात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक वेळा बस बाहेर काढताना वाहने आणि प्रवाशांच्या गर्दीतून बाहेर काढावी लागते. त्यामुळे बसस्थानकातील सध्याचा कारभार गोंधळाचा झाला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणीत दररोज सुमारे २०० बसेच्या फेऱ्या होतात. मात्र अपुरी जागा असल्याने वाहन चालकांबरोबरच प्रवाशांनाही कसरत करावी लागते. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
सुविधाही मिळत नसल्याने मनस्ताप
परभणी बसस्थानकावर प्रवाशांना पुरेशा सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एखाद्या खेडेगावातील बस थांब्यावर थांबल्याचा अनुभव परभणीतील स्थानकावर येत आहे.
प्रवाशांसाठी तात्पुरता पत्र्याचा शेड उभारण्यात आला. परंतु, या शेडमध्ये दुपारी १२ वाजेपासून ते सूर्य मावळेपर्यंत कायमस्वरूपी ऊन येते. त्यामुळे प्रवासी शेडमध्ये थांबण्याचे टाळतात. एखाद्या बसचाच सावलीसाठी आधार घ्यावा लागतो.
पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधाही उपलब्ध नाहीत. शिवाय स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे चिखल तुडवतच बस गाठावी लागते.
येथील बसस्थानकात बस उभी करण्यासाठीही पुरेशी जागा नाही. त्यामुळे प्रवाशांना त्यांची इच्छित बस गाठण्यासाठी स्थानकावर आल्यापासून सतर्क रहावे लागते. उभे राहूनच बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत.
-विष्णू जाधव, प्रवासी
परभणी बसस्थानकावर बसेस थांबवण्यासाठी फलाटांची निर्मिती केली नाही.त्यामुळे कोणत्या गावची बस कोठे उभी राहील, याचा नेम नाही. मागील सहा महिन्यांपासून अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांची तारांबळ होत आहे.
-यशवंत कुलकर्णी, प्रवासी
बसपोर्टच्या कामामुळे गैरसोय वाढली
शहरातील बसस्थानकावर अद्ययावत असे बसपोर्ट उभारणीचे काम सुरू झाले आहे. हे काम सध्या संथगतीने होत आहे. बसपोर्टच्या कामासाठी पर्यायी स्वरूपात बसस्थानकाचा कारभार चालविला जात आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.