अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जिल्ह्यात अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर या नुकसानीचा आढावा घेवून या संदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा प्राथमिक अहवाल आल्यानंतर तो राज्य शासनाकडे सादर केला जाईल, असे मुगळीकर यांनी सांगितले.
शेकडो हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज
जिल्ह्यात रबी हंगामात २ लाख २८ हजार ७९६ हेक्टर जमिनीवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये ९८ हजार ७७३ हेक्टरवर ज्वारी तर ३९ हजार १४ हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.तसेच १ लाख १८ हजार ७१६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या तिन्ही पिकांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या प्राथमिक अहवालानुसार सेलू तालुक्यातील हातनूर, रोहिना आदी परिरसरात जवळपास २५० ते ३०० हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या नुकसानीची माहिती मागविण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.