पालम शहरासह ग्रामीण भागातील शिवारात १८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस व वारा आला होता. यात पिकाची नासाडी झाली आहे. गहू पीक ओंब्या भरणीत होता. पावसाने पीक पूर्णतः आडवे पडले आहे. त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. तालुक्यात या वर्षी कांदा पीक घेणारे शेतकरी वाढले आहेत. शेतातील उभी कांदा पात पावसाने तुटून गेल्याने हिरव्या पातीचा चिखल पाहावयास मिळत आहे. ५०० हेक्टर कांदा अवकाळीच्या कचाट्यात सापडला आहे. काही ठिकाणी कापणीस आलेला हरभरा पावसाने भिजून खराब झाला आहे. तर पोटऱ्यात आलेली ज्वारी आडवी पडली आहे. त्यामुळे ज्वारी व कडबा खराब होऊन दुहेरी नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. बागायती पिकांना अवकाळी फटका बसला आहे. आंब्याचा मोहोर पावसाने गळाला आसून लहान कैऱ्यांचा सडा झाडाखाली पडला आहे. पपई पिकाची फळेही अवकाळी पावसाने गळाली आहेत.
अवकाळी पावसाचा रब्बीच्या पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:48 AM