केंद्राच्या निधीची प्रतीक्षा कायम
परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागात उभारण्यात येणाऱ्या घरकुलांना राज्य शासनाबरोबर केंद्र शासनाचाही निधी मिळतो. मात्र एक हजाराहून अधिक लाभार्थींना केंद्र शासनाचा निधी मिळाला नसल्याने त्यांच्या घरांचे काम अर्धवट अवस्थेत आहे.
वाहतुकीचा खोळंबा झाला नित्याचाच
गंगाखेड : पालम रेल्वे फाटकाजवळील रस्त्यावर वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दोन-दोन तास वाहतूक खोळंबत असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी
परभणी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी महानगरपालिकेने चौकाचौकात सिग्नल बसविले होते. सध्या सिग्नल बंद असल्याने केवळ ते शोभेचे झाले आहेत. शहरातील वाढलेली वाहतूक लक्षात घेता, सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी आहे.
जिल्ह्यात अवैध वृक्षतोड वाढली
परभणी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड वाढल्याने लाकूड विक्रेत्यांकडून विनापरवाना दररोज शेकडो झाडांची कत्तल केली जात आहे. अवैध वृक्षतोड होत असतानाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने वृक्षप्रेमी नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
वाळू उपश्याकडे महसूलचे दुर्लक्ष
गंगाखेड : तालुक्यातील गोंडगाव, धारासूर, दुसलगाव आदी ठिकाणांवरून वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू केला आहे. वाळूची प्रतिब्रास १० हजाररुपये या प्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हक्काचा निवारा मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.