कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तोंडावर मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझरने नियमित हात धुण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाची दहशत निर्माण झाली होती. तेव्हापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती असल्याने कटाक्षाने मास्कचा वापर केला जात असे. याशिवाय फिजिकल डिस्टन्स आणि इतर नियमही पाळले जात होते. मात्र, महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाली आहे. परिणामी, नागरिक बिनधास्तपणे जिल्हाभरात वावरत आहेत. मास्कच्या वापरामुळे केवळ कोरोनाच्या विषाणूपासूनच प्रतिबंध होतो, असे नाहीतर अन्य विषाणूजन्य आजारही टाळले जावू शकतात. केवळ निष्काळजीपणा करीत नागरिक मास्क वापरण्याचे टाळत आहेत. त्यामुळे विषाणूचा संसर्ग होवून साथरोग वाढत आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.
विषाणूजन्य आजार
ताप, डेंग्यू, कावीळ, गॅस्ट्रो, मेंदूज्वर हे आजार विषाणूजन्य आजारांमध्ये मोडतात. मास्कचा वापर केल्याने या आजारांच्या रुग्णांची संख्या मागील काही महिन्यांमध्ये घटली होती. मात्र, मागच्या एक-दीड महिन्यांतील रुग्णांचा विचार करता २० ते ३० टक्के साथरोगांचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये ताप, अस्थमा या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे डॉ. राहुल आंबेगावकर यांनी सांगितले.
मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळा
लॉकडाऊन काळात जिल्हाभरात नागरिक मास्कचा वापर करीत असल्याने त्याचे आरोग्यावर चांगले परिणाम दिसून आले. कोरोनाच्या रुग्णांव्यतिरिक्त इतर साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात घटले होते. विशेष म्हणजे, जिल्हा रुग्णालयात दररोज १ हजार ते १२०० रुग्णांची होणारी तपासणी चक्क १०० ते १५० वर आली होती. यावरुनच इतर आजार कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. सतत मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स आणि आरोग्याची विशेष काळजी घेतल्याने साथरोगांची रुग्णसंख्या घटली होती. मात्र, आता पुन्हा साथरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.