वस्सा : जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे हे आरोग्य केंद्र सलाईनवर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या केंद्रांतर्गत येणार्या ३५ हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे केंद्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोविडच्या काळात आरोग्य सेवा देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत ६ उपकेंद्रे येतात. त्याचबरोबर १० ते १५ गावांतील जवळपास ३५ हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी हे केंद्र घेते. मात्र मागील काही दिवसांपासून या आरोग्य केंद्रात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना आरोग्य सेवा देताना कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत या केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असून, केवळ एक अधिकारी कार्यरत असून, एक पद रिक्त आहे. तसेच मागील पाच वर्षांपासून मलेरिया प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे एक पद रिक्त आहे. परिचारिकांची चार पदे, तर वाहनचालकाचे एक पद रिक्त आहे. त्यामुळे या उपकेंद्राअंतर्गत रुग्णांना रात्री-अपरात्री सेवा देताना या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे आसेगाव व परिसरातील गावे ही परभणी जिल्ह्याच्या टोकावर येतात. त्यामुळे या गावाचे रुग्ण व नागरिकांना शहर व तालुक्याचे ठिकाण गाठण्यासाठी गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तात्काळ भरावीत व कोविडच्या काळात पूर्ण क्षमतेने रुग्णांना सेवा द्यावी, अशी मागणी आसेगाव व वस्सा यासह इतर गावांतील ग्रामस्थांमधून होत आहे.
वस्सा येथील उपकेंद्र गैरसोयीचे
जिंतूर तालुक्यातील आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे वस्सा येथील उपकेंद्रात परिचारिकेसह इतर पदे रिक्त आहेत. त्यामुळे दहा हजार लोकसंख्येचे गाव असूनही या उपकेंद्रात पूर्ण क्षमतेने कर्मचारीवर्ग जिल्हा आरोग्य विभागाने भरलेला नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवेसाठी आर्थिक झळ सोसून तालुका व जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागत आहे.