परभणी : जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांबरोबरच आता चार खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाची लस उपलब्ध होणार असून, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १ मार्चपासून खासगी रुग्णालयातही लसीकरण करून घेता येणार आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाच केंद्र शासनाने खासगी रुग्णालयांमध्येही ज्येष्ठ नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ मार्चपासून खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील २२ शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला प्राप्त झालेल्या डोसेसपैकी ७० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी लसीकरण करण्यात आले. आता हीच लस ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात १ मार्चपासून शासकीय रुग्णालयांबरोबरच चार खासगी रुग्णालयांतही लस उपलब्ध होणार आहे.
अशी करा नोंदणी
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात स्वनोंदणी पद्धत राबविली जाणार आहे. लाभार्थ्याला कोविन ॲप-२ डाऊनलोड करून घ्यावे लागेल. या ॲपवरून लसीकरण करता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, आदी कागदपत्रे लागतील. वयाची खात्री झाल्यानंतर या ॲपवर इतर माहिती दिसणार आहे. लाभार्थ्यांनी अपलोड केलेली माहिती आणि वय जुळल्यानंतर लसीकरण केंद्राचे नाव आणि स्थळ दिसेल. त्यानंतर कोणत्या स्थळी लस घ्यावी, याची निवड लाभार्थ्याला करता येणार आहे. कोणत्या तारखेला लस घ्यायची हे ठरविण्याचा अधिकारही लाभार्थ्यांना राहणार आहे.
६० वर्षांवरील नागरिकांना लस
दुसऱ्या टप्प्यामध्ये ६० वर्षांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना लस घेता येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या नागरिकांचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक आणि त्यास गंभीर आजार आहेत. अशा नागरिकांनाही ही लस दिली जाणार आहे.
साडेनऊ हजार जणांना लसीकरण
पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्याला ९ हजार ३३३ डोसेस प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्यामध्ये लस घेण्यासाठी सुमारे १४ हजार कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्या टप्प्यातील साधारणत: ३० टक्क्यांपर्यंतचे उद्दिष्ट अद्याप शिल्लक आहे.
या केंद्रावर मिळणार
सरकारी रुग्णालये
सेलू उपजिल्हा रुग्णालय
मनपा रुग्णालाय
जिल्हा रुग्णालय
गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय
खासगी रुग्णालये
डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
स्वाती क्रिटीकेअर आयसीयू ॲड ॲक्सिडेंट हॉस्पिटल
स्पर्श मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
मानवत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल