कोरोनाचा धोका अजूनही टळला नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करावे या उद्देशाने जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यात आले. सुरुवातीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, सद्य:स्थितीला हा प्रतिसाद कमी झाला आहे. जिल्ह्यामध्ये लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असताना नागरिक मात्र केंद्रांकडे फिरकत नाहीत. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी शासनाने नागरिकांच्या वयाची मर्यादा कमी केली. दोन दिवसांपूर्वी ३३ ते ४४ या वयोगटांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ३८ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ३ हजार ८०० डोस केंद्रांना पुरविण्यात आले; परंतु पहिल्याच दिवशी केवळ २ हजार ६१२ नागरिकांनी लस घेतली. उर्वरित लसीचा डोस शिल्लक आहे. त्यामुळे वयोमर्यादा कमी केल्यानंतरही नागरिकांचा प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे.
२५ टक्के लसीकरण पूर्ण
जानेवारी महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला. सहा महिन्यांच्या काळात केवळ २५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १८ लाखांपर्यंत आहे. त्यापैकी सगळ्यांचा सहा लाख बालकांचा समावेश आहे. उर्वरित १२ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने समोर ठेवले आहे. प्रत्यक्षात ३ लाख ९ हजार ५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यातही २ लाख ४४ हजार ८५६ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या केवळ ६४ हजार १४९ एवढीच आहे.
संसर्ग घटल्याचा परिणाम
कोरोनाचा संसर्ग घटल्याने आता लस कशाला घ्यायची? या भावनेतून अनेकजण लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवीत आहेत. त्यातच काही जणांनी कोणतीही लक्षणे नसतील तर कोरोनाची लस का घ्यावी? असा सवाल उपस्थित करीत लसीकरण करून घेतले नाही. मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात येतात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.