पेडगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली असल्याचे कारण देत परभणी तालुक्यातील पेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविडचे लसीकरण अद्याप सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे पेडगाव ग्रामस्थ लसीपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने पहिल्या टप्प्यात प्रत्येक आरोग्य केंद्राला लस उपलब्ध करुन दिली. ही लस आरोग्य कर्मचारी, औषधी दुकानदार, डॉक्टर्स यांना देण्याच्या सूचना दिल्या. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व मधुमेह यासह इतर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याच्या सूचना आल्यानंतर परभणी येथील जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे ही लस पोहोच केली. बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रातून ज्येष्ठ नागरिकांना सध्या ही लस दिली जात आहे. मात्र, परभणी तालुक्यातील पेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली असल्याचे कारण देत या ठिकाणी कोविड १९चे लसीकरण सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे येथील आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देऊन या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होईल, यासाठीचे प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.