परभणीतील ८ नागरी आरोग्य केंद्रासह अन्य ५ ठिकाणी शुक्रवारी लसीकरण करण्यात आले. शुक्रवारी सर्वच केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होती. असे असतानाही लसीचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने काही लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर लस येईपर्यंत वाट पाहावी लागली. यामुळे लाभार्थी व कर्मचारी यांच्यामध्ये किरकोळ वाद झाले. सुमारे साडेअकरा वाजता सर्वच केंद्रांवर लस पोहोचली. यानंतर लसीकरण सुरू झाले. यामुळे वर्मा नगर तसेच इनायत नगर येथे काहीजण लसीची प्रतीक्षा करत बसले होते. विशेष म्हणजे, लस घेण्यासाठी मिळणारे टोकणही सकाळी ७ ते १० च्या मध्ये वेळेवर मिलत नसल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. शहरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान दररोजच तांत्रिक अडचणी तसेच लसीचा होणारा अल्प पुरवठा व वेळेत लस उपलब्ध न होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे तर कर्मचाऱ्यांची अडचण कायम आहे. याकडे मनपाच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
केंद्रावर लस वेळेवर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:12 AM