परभणी : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यासह सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विविध कामगार संघटना, शेतकरी संघटना एकवटल्या असून, मंगळवारचा बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेले ३ कायदे शेतकरी विरोधी असल्याने या कायद्यांना सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे. हे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे १५ राज्यांतील लाखो शेतकऱ्यांनी २६ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. मात्र शासनाने या आंदोलनाची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे पाळला जाणार आहे. या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष-संघटनांबरोबरच सामाजिक संघटना आणि कामगार, शेतकरी संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शविला आहे. एकता हमाल मजदूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. सर्व हमाल, कामगार ८ डिसेंबर रोजी काम बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कॉ. रोहिदास नेटके, शेषराव सावळे, विश्वनाथ कसबे, नवनाथ उफाडे, लिंबाजी कांबळे, बालाजी सावळे, दिगंबर काकडे, भारत कांबळे, गजानन कांबळे आदींनी कळविले आहे. त्याचप्रमाणे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ॲड. सुरेश माने, जय हो बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बहुजन क्रांती मोर्चा आदीं संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
शेतकऱ्यांसाठीचा बंद ऐतिहासिक राहील
आतापर्यंत देशात अनेक आंदोलने झाली. मात्र शेतकऱ्यांसाठी पुकारलेला हा बंद ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. नागरिकांनी आपल्या अन्नदात्यासाठी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन खा. बंडू जाधव, आ. सुरेश वरपूडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. शेतमालाला हमीभाव देण्याची हमी केंद्र शासनाच्या कायद्यात नाही. त्यामुळे उद्योजकांचे भले होणार असून, शेतकरी भरडला जाणार असल्याने या कायद्याला विरोध आहे. दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनास काँग्रेस पक्षाने यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांसाठी राज्यभर सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. याच शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या देशव्यापी बंदमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आ. वरपूडकर यांनी केले. या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. राजन क्षीरसागर, राकाँचे दादासाहेब टेंगसे, माणिक कदम, व्यापारी महासंघाचे सचिन अंबिलवादे, माजी सभापती रवि सोनकांबळे, प्रा. तुकाराम साठे आदींची उपस्थिती होती.