परभणी : मागील वर्षीच्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस चालक- मालकांची वाहने जागेवरच उभी असून, या वाहनातून आता भाजीपाला, कपड्यांची विक्री केली जात आहे.
शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करुन अनेकांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगार निवडला होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूलबस वाहनचालकांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. वाहने जागेवरच उभी राहून असल्याने काही वाहन मालकांनी आता या वाहनांचा वापर भाजी विक्री आणि कापड विक्रीसाठी सुरू केला आहे. तर काहींनी आपले वाहन चक्क विक्री केले आहे. एकंदर स्कूल वाहन चालक सद्यस्थितीला आर्थिक अडचणीत आहेत.
रोजगार उपलब्ध होईल या उद्देशाने कर्ज काढून वाहन खरेदी केेले. सुरुवातीचे काही वर्ष बऱ्यापैकी व्यवसाय झाला. मात्र आता तो ठप्प आहे. त्यामुळे वाहनाच्या कर्जाचे हप्ते थकले असून, ते कसे फेडावे याची चिंता आहे.
- संतोष ठाकूर
कर्ज काढून वाहनाची खरेदी केली होती. विद्यार्थ्यांची ने-आण करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला जात होता. मात्र दोन वर्षांपासून हा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
- अरुण चंद्रे
शाळा बंद असल्याने वाहन घरासमोरच उभे रहात आहे. या वाहनाचा वापर व्हावा व उत्पन्न मिळावे या उद्देशाने आता ते भाजी विक्रीसाठी वापरत आहे. जुना पेडगाव रोड भागात वाहनातून भाजी आणून विक्री करतो.
- आसीम खान
शाळा बंद असल्याने रोजगार बुडाल्याने आता नवीन व्यवसाय सुरू केला आहे. शहरात मिळेल त्या ठिकाणी थांबून बेडशीट व इतर कपडे विक्री करुन कुटुंबाची गुजराण करीत आहे. त्यासाठी स्कूल वाहनाचा वापर केला.
- सय्यद बशीर
स्कूलबस बंद असल्याने आता या बसचा वापर बेडशीट आणि इतर कपड्यांच्या विक्रीसाठी केला जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यवसाय सुरू केला आहे.
भाजी विक्रीसाठीही वाहनांचा वापर करुन कसेबसे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुना पेडगाव रोड भागात भाजी विक्रीसाठी हे वाहन वापरले जाते.
शासनानेही सोडले वाऱ्यावर
परभणी शहरात सुमारे ३०० पेक्षा अधिक स्कूलबस चालक आहेत. विद्यार्थ्यांची ने-आण करुन कुटुंबाची आर्थिक गुजराण केली जात होती. मात्र कोरोना संसर्गामुळे शाळा बंद पडल्या आणि मागच्या दोन वर्षांपासून वाहने घरासमोरच उभी आहेत. शासनाने इतर घटकांना मदतीचा हात दिला. मात्र स्कूलबस वाहन चालकांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे वाहन चालकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.