गंगाखेड: तालुक्यातील खळी गावालगत गोदावरी नदी काठावर असलेल्या शेतात अशोक जाधव यांच्या आखाड्याजवळ घोणस हा विषारी साप आढळून आला होता. या मादी सापाने(दि.6) जुलै रोजी तब्बल 30 पिलांना जन्म दिला आहे. सर्पमित्रामुळे सापासह त्याच्या 30 पिलांना जीवदान मिळाले आहे.
तालुक्यातील खळी गावालगत असलेल्या गोदावरी नदी काठावरील अशोक जाधव यांच्या शेतात (दि.3) जुलै रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घोणस हा विषारी साप आढळला होता. सापाला पाहताच नागरिकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचवेळी गावातील एका तरुणाने सर्पमित्र किरण भालेराव यांना फोन करून ही माहिती दिली. सापांना वाचवण्यासाठी सतत सक्रिय असलेल्या किरण भालेराव यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र चेतन लांडे, मन्मथ मंदोडे यांच्या सोबत खळी गावाकडे धाव घेतली.
यावेळी त्यांना पाच प्रमुख विषारी सापांपैकी एक असलेल्या घोणस या जातीचा विषारी साप असल्याचे दिसून आले. यानंतर सर्पमित्र चेतन लांडे यांनी अत्यंत चपळाईने सापाला पकडले आणि वस्तीपासून लांब निर्जनस्थळी जंगलात सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण, हा साप गरोदर असल्याचे निरदर्शनास आल्याने सर्पमित्र चेतन लांडे, किरण भालेराव, मन्मथ मंदोडे यांनी पुणे येथील सर्पमित्र श्रीकांत भादडे, नाशिक येथील साईदास कुसळ यांचे मार्गदर्शन घेत सापाला जंगलात न सोडता चेतन लांडे यांच्या घरी निगराणीखाली ठेवले. आज त्याच घोणसने सकाळी 7 वाजेच्या सुमारास तब्बल 30 पिलांना जन्म दिला. सर्पमित्र चेतन लांडे, किरण भालेराव यांच्या सतर्कतेमुळे घोणस सापासह त्याच्या 30 पिलांना जीवदान मिळल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
साप आणि पिलांना निर्जनस्थळी सोडणार
तालुक्यातील खळी गाव शिवारात सापडलेले घोणस जातीचे विषारी साप गरोदर असल्याचे समजल्याने त्याला कोणी मारू नये व त्याच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून त्यास निगराणी खाली ठेवले होते. गरोदर सापाने 30 पिलांना जन्म दिला आहे. तो आणि त्याचे पिल्ले व्यवस्थित असल्याने या घोणस जातीच्या विषारी सापाला व त्याच्या पिलांना मानव वस्तीपासून लांब निर्जनस्थळी जंगलात सोडणार असल्याचे सर्पमित्र चेतन लांडे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.