महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.ए.पी. सोमकुंवर यांच्या आवाहनानुसार स्वच्छ आणि हरित परिसर संकल्पना राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाची प्रत्येक इमारत परिसरात वृक्षारोपण करणे, स्वच्छता राखणे आदी उपक्रम हाती घेतले जात आहेत. मागील वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असून, यावर्षी देखील त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयात श्रमदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात पशुचिकित्सालय, ग्रंथालय, मुख्य इमारत परिसर आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या ठिकाणी जमा केलेला वाळलेला पाचोळा खत स्वरुपात कुजविण्यात येणार आहे.
महाविद्यालयातील स्थावर मालमत्ता अधिकारी डॉ.भागिरथ बल्लूरकर, अभियंता प्रमोद तायडे, सहायक कुलसचिव ऋषीकेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे श्रमदान शिबीर राबविण्यात आले. कुलगुरू डॉ.आशिष पातूरकर यांची संकल्पना तंतोतंत अंमलात आणली जात असून, स्वच्छतेवर होणारा खर्च श्रमदानातून बचत होत आहे, असे सहयोगी अधिष्ठाता डॉ.नितीन मार्कंडेय यांनी सांगितले.