जिंतूर ( परभणी ) : रस्त्याअभावी पिंप्राळा येथील ६५ वर्षीय आजारी वृद्ध महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी ( दि. ११ ) घडली. आठ दिवसांपूर्वीच गर्भवती महिलेस उपचारासाठी तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागल्याची घटना ताजी असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मागच्या आठवड्यात पिंप्राळा गावातील एका गर्भवती महिलेस माळरानातील चिखलाचा रस्ता तुडवत तीन किलोमीटर पायी चालत यावे लागले. या घटनेने संपूर्ण जिल्हा आवाक् झाला होता. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने रस्त्याचे काम तातडीने हाती घेऊ असे आश्वासनही दिले होते. या घटनेची चर्चा सुरुच असताना याच गावातील पार्वतीबाई महादु ढाकरे या ६५ वर्षीय वृध्द महिलेला शुक्रवारी ( दि. ९ ) रात्री झोपेत असताना अर्धांगवायूचा झटका आला. परंतु, दोन दिवस पाऊस सुरु असल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे गावात वाहन येणे शक्य नव्हते.
पार्वतीबाई यांची प्रकृती खालावत असल्याने गावातील भीमराव ढाकरे यांनी जीपमधून त्यांना उपचारासाठी नेण्याचे ठरवले. मोठ्या प्रयत्नाने गावातील तरुण मुलांना सोबत घेऊन त्यांनी जीप चिखलातून तीन किलोमीटर बाहेर काढत जिंतूर गाठले. तेथून पुढे सुलतानपुर (जि.बुलडाणा) येथे खाजगी दवाखान्यात त्यांना नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून आता उपचारासाठी उशीर झाला असून औषधउपचार करणे शक्य असल्याचा अभिप्राय दिला. यामुळे नातेवाईकांनी पुन्हा परतीचा प्रवास करत पार्वतीबाईला यांना गावी आणले. यानंतर रविवारी (ता.११) सकाळी त्यांचा मृत्यू झाला.