- प्रशांत मुळी
येलदरी ( परभणी) : परतीच्या पावसाने मागील चार दिवसांपासून हाहाकार माजवला आहे. प्रचंड प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. येलदरी धरणाच्या वरच्या भागात असलेल्या खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने येलदरी धरणात आवक वाढली आहे. पाऊस आणि वाढती आवक लक्षात घेता प्रशासनाने येलदरी धरणाचे आज सकाळी ६ दरवाजे तर दुपारी सर्वच्या सर्व १० दरवाजे उघडण्यात आले आहेत.
सध्या धरणाच्या सर्व दहा दरवाजातून २२, १२० क्युसेक क्षमतेने विसर्ग होत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असा सुरु आहे विसर्ग अचानक वरच्या धरणातून आवक वाढल्याने आज सकाळी गेट क्रमांक १, ३, ५, ६, ८ आणि १० उघडून विसर्ग सुरु करण्यात आला होता. मात्र आवक आणि पावसाचा अंदाज घेऊन दुपारी २ वाजता पुन्हा धरणाचे गेट क्र. २, ४, ७ आणि दरवाजे उघडण्यात आली. सर्व दहा दरवाजे ०. ५ मीटरने उघडून सध्या २२, १२० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर जल विद्युत केंद्रातून १८०० क्युसेक असा एकूण २३, ९३० क्युसेक क्षमतेने सध्या येलदरी धरणातून विसर्ग सुरु आहे.