- सत्यशील धबडगे
मानवत: तालुक्यातील 9 ते 10 गावांत आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळाने अनेक घरांवरील पत्रे उडून गेली. तर काही गावात विजेचे खांब कोसळ्याने विज पुरवठा बंद झाला. पार्डी येथील शाळेवरची पत्रे आणि शेड तुटून पडले आहेत.
तालुक्यातील मानवतरोड, कोल्हावाडी, नरळद,कोथाळा, पार्डी, टाकळी नि, सोमठाणा अटोळा, मंगरूळ पा प, आदी गावात सायंकाळी जोरदार वादळी वारे सुटल्याने घरावरील पत्रे उडून गेली, तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. 5 ते सात मिनट गारांचा पाऊस पडला असून शेतात गारांचा खच दिसून येत होता. शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला झाला.
याबाबत तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याशी संपर्क साधला असता वादळी वाऱ्यामुळे गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित तलाठ्यांना गावात भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिल्याचे तहसीलदार टेमकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.