परभणी : नेता होणे सोपे असते; परंतु सर्वसामान्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान होणे कठीण असते. हे कार्य विजय वाकोडे यांनी लीलया पद्धतीने केले. त्यामुळे ते सर्वसामान्यांचे नेते आहेत, असे प्रतिपादन आ. सुरेश वरपुडकर यांनी केले.
येथील हरिप्रसाद मंगल कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी विजय वाकोडे यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी आमदार वरपूडकर बोलत होते. तहसीन अहमद खान यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास माजी खासदार तुकाराम रेंगे, गणेशराव दुधगावकर, माजी आमदार विजय गव्हाणे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, उपजिल्हाधिकारी भारत कदम, प्रभारी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, स्वागताध्यक्ष सुरेश नागरे, मौलाना रफियोद्दिन अशरफी, रिपाइंचे डी. एन. दाभाडे, प्रकाश कांबळे, डॉ. सिद्धार्थ भालेराव, प्रमोद वाकोडकर, मिलिंद सावंत, सभापती रामराव उबाळे, ज्योतीताई बगाटे, राधाजी शेळके, सुनील बावळे, विशाल बुधवंत, कलीम खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी सभापती रवी सोनकांबळे यांनी प्रास्ताविक केले. तर यशवंत मकरंद यांनी सत्कार सोहळ्याची भूमिका विशद केली. कार्यक्रमात प्रभू दिपके, यशवंत मकरंद, सुनील ढवळे, वर्षा सेलसुरेकर, बाबासाहेब भोसले यांनी तयार केलेल्या लघुपटाचे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच भीमप्रकाश गायकवाड, कीर्तीकुमार मोरे यांनी संपादित केलेल्या अपराजित योद्धा या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना विजय वाकोडे म्हणाले, मोर्चे, हरताळा, रास्ता रोको, बंद ही लोकशाहीतील आंदोलनाची हत्यारे उपसुन संवैधानिक मार्गाने अनेक लढे उभारले; परंतु कधीही परभणीतील शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लागू दिले नाही. संविधानाच्या माध्यमातून पीडित, वंचितांना न्याय देण्याचा वसा विद्यार्थिदशेपासून उचलला आहे, तो आजपर्यंत कायम असल्याचे त्यांनी सांगितले. सिद्धार्थ भराडे, प्रणिता देशपांडे, वर्षा सेलसुरेकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत लहाने यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी प्रयत्न केले.