परभणी : पूर्णा तालुक्यातील माहेर पाटीपासून ते गावापर्यंतचा तीन किमी रस्ता तयार करून देण्यासाठी ग्रामस्थांनी २३ सप्टेंबर रोजी गाव विक्रीला काढले. मात्र, गावात येणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल असल्याने इतर गावांतील बोलीदारही गावात आले नाहीत. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ग्रामस्थांनी रस्त्यावरील चिखलात उभे राहून थाळ्या वाजवल्या, तर मंगळवारी अर्धनग्न होत आंदोलन केले. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे साहेब तुम्हीच सांगा हो, आम्ही अजून काय करायचे, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.
वर्षभरापूर्वी माहेर गावातील रहिवाशांनी रस्त्यासाठी उपोषण केल्यावर जिल्हाधिकारी व जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले. त्यानंतर या रस्त्यावर कच्चे खडक टाकण्यात आले. मात्र, रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही. रस्त्यावर आठ महिने दोन-तीन फूट चिखल राहतो. या चिखलातून ग्रामस्थांना तालुका, जिल्ह्याचे ठिकाण गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मागील वर्षी शालेय पोषण आहाराचा ट्रक रस्त्याअभावी परत गेल्याने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या फौजफाट्याने गाव गाठले. विशेष म्हणजे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आपल्या गाड्या सोडून पायीच गाव गाठावे लागले होते.
प्रशासन ढिम्मच संतप्त ग्रामस्थांनी २५ सप्टेंबरपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर गाव, घर, शेतीवाडीही बोलीद्वारे विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला. तसे निवेदन २२ सप्टेंबर रोजी तहसीलदार पल्लवी टेमकर यांना दिले. त्यानंतर तरी प्रशासन तातडीने पावले उचलत रस्ता दुरुस्तीबाबत निर्णय घेईल असे वाटत होते. मात्र, तसे काहीही झाले नाही.
१६ वर्षांपूर्वी रस्त्याचे माती काम माहेर हे गाव ताडकळस ते पालम राज्य रस्त्यावर पश्चिमेस साडेतीन कि.मी. अंतरावर आहे. मात्र, या गावाला इतर गावाशी, मुख्यालयाशी तालुका व जिल्हा जोडणारा दळणवळणासाठीचा पक्का रस्ता नाही. २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने या रस्त्याचे खोदकाम व मातीकाम करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले.