लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जीव तोडून काम केलेल्या कामाची पावती आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीत मदत म्हणून मिळेल, या आशेवर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांच्या गावपातळीवरील पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीसाठी पॅनेल करण्यापासून अर्ज दाखल करणे, उमेदवारी अर्ज अवैध ठरण्यापर्यंत या पुढाऱ्यांनी स्वबळावर तयारी केली. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर आपल्या पक्षाच्या नेत्यांची मदत होईल, असे सर्व पक्षांच्या पॅनेलप्रमुखांना वाटू लागले. मात्र ग्रामपंचायत निवडणूक जशी जशी रंगात येऊ लागली, तशी तशी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीतून अंग काढून घ्यायला सुरुवात केली. परिणामी गावपातळीवरील खासदार समर्थकांसह आजी-माजी आमदार समर्थकांवर निवडणुकीचा किल्ला स्वबळावर लढविण्याची वेळ आली. काही ठिकाणी या समर्थकांना दारुण पराभव स्वीकारावा लागला, तर काही ठिकाणी कसाबसा आपला गड राखला गेला. पाथरी मतदार संघाचे आ. सुरेश वरपूडकर यांच्या काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश संपादन करता आले नाही. खा. संजय जाधव यांनीही या ग्रामपंचायत निवडणुकीकडे कानाडोळा केल्याने शिवसेनेलाही अपेक्षित यश मिळवता आले नाही. भाजपचे माजी आ. मोहन फड हे तर निवडणूक जाहीर झाल्यापासून या निवडणुकीपासून दूर असल्याचे चित्र दिसून आले. परिणामी फड यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा फायदा त्यांना उठवता आला नाही. परिणामी त्यांनाही या निवडणुकीत चमक दाखवता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. बाबाजानी दुर्राणी हेही आपल्या पाथरी होमपीचवर व्यस्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पुढारी बॅकफूटवर आल्याचे चित्र होते. खासदार व आजी-माजी आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत हात आखडता घेतल्याने त्याचा परिणाम निकालावर दिसून आला. आपल्या नेत्याच्या निवडणुकीत जिवाचे रान करणाऱ्या गाव या पुढाऱ्यांना आयत्यावेळी नेत्यांची ताकद न मिळाल्याने पराभव स्वीकारावा लागला. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाला व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही या निवडणुकीत आपला करिश्मा दाखवता आला नाही. यामुळे या पक्षाच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
गावपातळीवरील पुढाऱ्यांनी स्वबळावर लढविला किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:18 AM