म्हाळसापूर हे १६०० लोकसंख्येचं एक छोटंसं गाव. ८०० हेक्टर लागवड क्षेत्र असलेल्या या गावामध्ये बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. तसेच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची नेहमी टंचाई असायची. गावाला लागूनच कसुरा नदीचे पाणी पावसाळ्यात पुराने भरून निघून जायचे. परंतु, ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ यासारखे साधन नसल्याने या पाण्याचा गावकऱ्यांना उपयोग होत नव्हता. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे सात-आठ नळ असून भूगर्भात पाणी नसल्याने ते कोरडे राहतात. गावातील महिलांना गावाजवळील शेतात विहीर किंवा बोअरवेलमधून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. २०२० पर्यंत गावामध्ये पाण्याची टंचाई गावाचा पाठ सोडत नव्हती. त्यामुळे गावातील युवकांनी एकत्र येऊन ‘ग्रामविकास मंच’ नावाची चळवळ सुरू केली. गाव एक झालं, गावातील लोकांनी पाणी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन लोकवर्गणी जमा केली. गावाजवळ पडीक सरकारी गायरान जमिनीवर ४० लाख लिटर क्षमतेचा गावतलाव तयार केला. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी गावात येऊन गावकऱ्यांच्या कामाचं कौतुक केले व तरुणांचा उत्साह पाहून विकासकामासाठी हे गाव दत्तक घेतले. या गावात लांबून पाण्याची आवक असल्याने पहिल्याच पावसात शेततळे पूर्ण भरले. या शेततळ्याला लागूनच ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक विहीर खोदली गेली. शेततळ्याचे पाणी भूगर्भात जाऊन या विहिरीलासुद्धा पाणी लागले. ‘पाणीटंचाई असलेले गाव’ अशी अनेक वर्षे असलेली ओळख लोकसहभागातून उभारलेल्या गावतलावाने मिटविली.
कृषी विभागामार्फत ४० शेततळी
गावातील युवकांनी या गावतलावाला एक मॉडेल मानून म्हाळसापूर शिवारामध्ये एकाच वर्षात कृषी विभागामार्फत ४० शेततळी पूर्ण केले. तसेच गावामध्ये फळबाग लागवडसुद्धा वाढली. यामध्ये सीताफळ, पेरू, लिंबू यांसारख्या फळपिकांचा समावेश आहे. या गावतलावामुळे गावातील लोकांना पाण्याचे महत्त्व समजले व गावातील पाण्याची टंचाई कायमची दूर झाली आहे.
आधुनिक शेतीकडे वाटचाल
गावातील युवकांनी कृषी उद्योजक शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू केली. तसेच एक लाख रुपये लोकवर्गणी जमा करून म्हाळसापूर-गोरेगाव या पांदण रस्त्याचे रूपांतर कच्च्या रस्त्यामध्ये केले. प्रशासनाकडून या कच्च्या रस्त्यावर मजबुतीकरण करण्यात आले. एकंदरीत माळसापूरमध्ये सामूहिक गावतलावापासून सुरू झालेली ही विकासाची घोडदौड चालूच आहे.